|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| सदगुरुप्राप्ती ||

अक्षरे आहेत पण प्रकाश नाही. मार्ग आहे पण दीपक नाही...आता अंत नका पाहू सदगुरु!.....’ यशवंतराव तळमळत होते. निद्रादेवी जवळ येत नव्हती. उत्तर रात्र होऊन गेली होती. अश्रूंचा ओघ थांबत नव्हता. झोपेची अंमळ तार आली. झोप कसली? सुषुप्ती अवस्थाच ती!...हळूहळू धुसर प्रकाश पसरत चालला. त्यात जांभळ्या रंगाची छटा येऊ लागली आणि एक तेजस्वी महापुरुष समोर बसलेला दिसला. आजानुबाहू, दिगंबर, डाव्या मांडीवर उजवी मांडी ओढून धरलेली. पायांचे तळवे मात्र जमिनीला टेकलेले, भव्य कपाळ, हिऱ्याप्रमाणे चकाकणारे नेत्र, भेदक नजर...! ते महापुरुष म्हणाले, ‘ बेटा घबराओ नही, ये ले काम की चीज’ एक शाळीग्राम यशवंतरावांच्या हातावर ठेऊन ते म्हणाले, ‘इसकी भक्तीभावसे पूजा करना. तुम्हारी मनोकामना पूरी होगी’ नंतर ते अंतर्धान पावले. यशवंत रावांना जाग आली तळमळ शांत झाली ते मनोमन हसले. या सुखद स्वप्नाचा आस्वाद पुन: पुन: घ्यावा असे त्यांना वाटू लागले. काही वेळ त्याच आनंदात ते पडून राहिले. मग उष:काल झाला. तसे ते विष्णू सहस्त्रनाम सुरु करुन हात टेकून उठू लागले. पण हे काय?.... हाताच्या तळव्याखाली काहीतरी टणक वस्तू आहे असे वाटते. हात बाजूला केला तो काय? ‘शाळीग्राम’ हो शाळीग्रामच! मग मला स्वप्न पडले ते स्वप्न होते की सुषुप्ती? त्या महापुरुषाने दिलेला शाळीग्राम प्रत्यक्ष माझ्याजवळ आहे. त्याला स्वप्न कसे म्हणू? साक्षात्कारच तो! यशवंतरावांना एकदम ताजेतवाने वाटू लागले. यशवंतरावातील हा बदल सर्वांना सुखद वाटला. त्या दिवसापासून त्यांनी तो शाळीग्राम दररोजच्या पूजेत ठेवला.थोडयाच दिवसानंतर त्यांना पुन्हा स्वप्नदृष्टांत झाला. शालिग्राम देणारे महापुरुष पुन्हा स्वप्नात आले. त्यांनी आज्ञा केली.”तो शाळीग्राम घुन आमच्या भेटीस यावे. आम्ही हल्ली मंगळवेढयास वास्तव्य करुन आहोत. शालीग्रमासह महाराज मंगळवेढ्याच्या वाटेला लागले.

परंपदी संगम पूर्ण जाला

मंगळवेढयास तपास करीत ते एका वाड्यात आले. समोर तो महापुरुष बसलेला होता. स्वप्नात दोनदा दर्शन झाले त्याच अवस्थेत तो आताही बसलेला होता.तेच सिद्धासन तेच आजानुबाहू,तीच भेदकनजर, तेच तेजस्वी नेत्र, तेच भव्य कपाळ! यशवंतरावांचे देहभान हरपले. तोंडातून शब्द फुटेना! अखेर ते भानावर आले.स्वामींच्या शब्दांनी! काय रे, तो शाळीग्राम-नरसिंह आणलास काय? यशवंतरावांना अंतरीची खूण पटली. त्यांनी विनम्र भावाने शाळीग्राम काढून स्वामीच्या चरणावर देह झोकून दिला. स्वामींनी त्यांच्यावर कृपादृष्टी टाकून म्हंटले.’थांब तुझा मागचाच रस्ता पुढे चालू करतो.’ नंतर त्यांनी कपाळावर हात ठेवला आणि....

अनेक प्रकाशवलये कपाळातच असल्यासारख वाटले. पाठीतून खालच्या बाजूने वरपर्यंत वीज चमकून कपाळातील प्रकाशवलयांत मिसळली. त्यात सर्व काही होते. आसमंत होते. पृथ्वी होती, देव होते, दानव होते, मानव होते, प्राणी होते, चराचर विश्व होते.हे सर्व होते तरी ते ‘मी’ वाचून नव्हते, मीही स्वामी, स्वामीत मी, सर्वात मी, माझ्यात सर्व! हा अनुभव अपूर्व होता. मिथ्याचे तथ्य आणि त्थ्याचे मिथ्यत्व यांची ओळख करून देणारा होता.! ‘अहं ब्रम्हास्मी...’ यशवंतरावांनी तथ्याला शब्द्बबध्द केले. ‘म्हणजे देव देखील ना?’ स्वामींनी गमतीने विचारले.
‘हो, पण तो देखील आपणच !’
‘आणि तू नाही का?’ स्वामींनी पुन्हा म्हटले.
‘होय देवा. आज मी देवमय झालो, स्वमीमय झालो. अनाथाचा सनाथ झालो’ यशवंतराव नेत्रोन्मिलन करीत म्हणाले. ’ए. आज तू फारच देव, देव म्हणतो आहेस. जरा थांब. मागचा रस्ता पुढे चालू झाला की तुलाच लोक देव म्हणतील.’ असे म्हणत स्वामींनी त्यांना प्रेमाने चापटी मारली आणि क्षणभरात वीजेसारखा लख्ख प्रकाश, भूमध्याच्या समोर दिसला. त्यात स्वामी! स्वामींच्या पुढयात ते स्वतः अनेक प्रकाशवलय एकत्रित झाली. स्वामींच्या ठिकाणी दंड, कमंडलूधारी गुलाबी वर्णाचे संन्यासी दिसू लागले ! पुन्हा प्रकाश वलयांची हालचाल! काही तेजस्वी ठिणग्या ! संन्याशाच्या ठिकाणी ‘तीन शीरे सहा हात’ दिसू लागले. आणि लगोलग शंखचक्रधारी हरी व त्याच्या पुढयात दामाजीपंत दिसू लागले. हळू हळू... यशवंतरावांची भावसमाधी उतरत होती. ते भानावर येऊन म्हणाले – ‘’हे देवाधि देवा आज मी धन्य झालो. साक्षात वैकुंठीचा राणाच गुरुदेव म्हणून मिळाला. हे नरसिंह देवा, नृसिंहसरस्वती, दत्तात्रेया पंढरीनाथा, स्वामी समर्था तुला कोटी कोटी! प्रणाम !! यशवंतरावांनी दोन दिवस भक्तीभावाने स्वामी समर्थांची पाद्यपूजा केली. नैवद्य दक्षिणा इ. अर्पण केले. गावात अन्नदान व दानधर्म केला. नंतर स्वामींच्या चरणीची धूळ मस्तकाला लावून आनंदभरीत अंत:करणाने त्यांनी म्हंटले:-

चराचर व्यापकता जयाची |
अखंड भेटी मजला तयाची ||
परंपदी संगम पूर्ण जाला |
विसरू कसा मी गुरु पादुकाला ||

|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2020 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation