|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| पूर्वजांचा इतिहास ||

सुबुद्धी व विवेक निर्गुण यांचे उदात्तीकरण करीत परिसीमेपर्यंत पोहचले कि श्री गणेश साकार होतो. त्या मती प्रकाशक सिध्दिदात्याला प्रणाम! बुद्धीच्या अंकित असलेली विद्या म्हणजेच गणपतीबरोबर अढळपणे असणाऱ्या देवी सरस्वतीला माझा नमस्कार! अनंत कोटी ब्रम्हांड नायक व अनंत ज्ञान विश्वाचे दाते श्री. स्वामी समर्थ यांना पुन: पुन: नमस्कार! मी आरंभिलेला अक्षर यज्ञ पूर्णत्वास जाऊन त्याचे फलस्वरूप संत श्रेष्ठ श्री. यशवंतराव महाराज अर्थात साधू देवमामलेदार यांचे चरित्र विशुध्द स्वरुपात तयार होवो व ते सकल प्राणीमात्रांना उपकारक ठरो. अशी प्रार्थना सर्व विबुधांना करीत आहे.

पूर्वजांचा इतिहास

संतांचे जन्म हे काही अपघाताने होत नसतात. त्यांना उज्ज्वल पार्श्वभूमी असते. ही पार्श्वभूमी स्वत:ची असते तशीच घराण्याचीही असते.बहुसंख्य संताच्या बाबतीत ते भगवद्‌भक्तीची परंपरा असलेल्या कुळात जन्माला आल्याचे दिसते. अशीच परंपरा लाभलेले घराणे सोलापूर जिल्ह्यात प्रसिद्ध पंढरपूर तालुक्यात भोसे या गावी होते. ते या गावाचे वतनदार कुलकर्णी व देशपांडे होते. त्यांचे नाव श्री. नारायणराव देशपांडे. जहागीरदार(सरदार) म्हणून गावाचा कारभार नारायणरावांकडेच होता. ते ऋग्वेदी त्रीप्रवरी अश्लायणी शाखीय ब्राम्हण असून काश्यप गोत्रीय होते. नरसिंह हे त्यांचे कुलदैवत ! नाव नारायण व कुलदैवत नरसिंह हा सुखद योगायोग म्हणावा लागेल. अधिकार संपन्न असूनही हे सदाचारी होते. कुलदैवताला भजणारे होते. नारायणरावांना व त्यांच्या पतिव्रता पत्नीला एक सदाचार संपन्न पुत्र झाला. त्यांचे नाव धुंडीराज.

लोक त्यांना धोंडीपंत म्हणत.वडीलांनंतर वतनदारी त्यांचेकडे आली. हे देखील भगवद्‌ भक्त होते. दीनदुबळ्यांना यथाशक्ती मदत करण्यात ते मग्न असत. अखिल महाराष्ट्राचे प्राणप्रिय दैवत व संताची मायमाउली पंढरीनाथाच्या वारकरयांना व यात्रेकरूंना ते आश्रय देत. तसेच वरचेवर अन्नसंतर्पणही करीत असत. धोंडोपन्ताची पत्नीही साध्वी होती. मात्र त्यांच्या संसारात एक उणीव होती. त्यामुळेच उभयता पती-पत्नी खिन्न होते. त्यांच्या संसार वेलीवर अद्याप फूल उमलत नव्हते. धोंडोपंतांनी विचार केला. “आपल्या कुळाची काळजी वाहणारे कोण? अर्थात कुलदैवतच मग झाले तर! आपण नरसिंहाला शरण जायला हवे.” आपल्या मनातील विचार त्यांनी लगेच अंमलात आणला. दर शनिवारी ते सपत्नीक नृसिंहपूरला जाऊ लागले. दोघेही कळवळून प्रार्थना करीत! “हे देवाधिदेवा आमच्या कुळाची लाज राखावी. हे नृसिंहदेवा आम्हाला वंशाला दिवा द्या.” दिवसामागून दिवस जात होते. पण प्रार्थना फलद्रूप होत नव्हती. अनेक शनिवार गेले एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सात वर्षे दर शनिवारी नृसिंहपूरला जाणे टळले नव्हते. पण....आणि एके दिवशी धोंडोपंताच्या स्वप्नात नरसिंह देव आले. “तुम्ही आता दर शनिवारी माझ्याकडे येण्याचे कष्ट घेऊ नका. मीच तुमच्या घरात वास्तव्य करीन” असे त्यांनी म्हंटले. नंतर धोंडोपंताना त्यांच्या तुळशीवृंदावनात नृसिंह मूर्ती सापडली. देव नवसास पावला व लवकरच त्यांना पुत्ररत्न झाले. त्याचे महादेव असे नाव ठेवले. एकुलता एक मुलगा! आई त्याचे सर्व प्रकारचे लाड करी. महादेव वडीलांप्रमाणेच गुणवान, सदाचारी, दानी व निरभिमानी होते.

|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2019 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation