|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| श्री यशवंतराव महाराजांचा पोवाडा - १ ||

ऐका हो संताचे पोवाडे
जागा शिकविती ज्ञानाचे धडे|
एक एक संत वीर गाढे प्रसिद्ध आले|
हे यशवंतरावाचे चरित्र आज कथिले | ||धृं||
आजोबा धोंडी नारायण|
देशपांडे कुलकर्णी वतन|
मूळ ठिकाण त्यांचे राहणी भोसे गावाला|
तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूरला|
पुत्र झाला त्यासी महादेव|
हरीबाई असे सुनेचे नाव|
कुलदैवत नरहरी पूजती त्याला
आठ पुत्र एक कन्येचा परिवार झाला|
दुसरा पुत्र त्यांना उपजत|
सर्व कार्यामध्ये येश यत |
म्हणून नाव यशवंत ठेविले त्याला|
आरंभ कथा नायकाचा येथून झाला|
सन अठराशे पंधरा साली|
ऑगष्ट तारीख तेरा आली|
त्या दिवशी देवाचा जन्म पुणे शहराला|
पेशवाईत वडील होते तेव्हा नौकरीला |
चाल:
लहानपणी लहान मुलाला जमवून|
मातीचे फुले फळे देव मतीचा करून |
असे बंड चालविले बंड्या म्हणती विनोदान|
वडिलाच्या पासी विद्या संपादून|
ब्रह्मकर्म संध्या शिकला गुरूपासून |
वयाच्या बाराव्या वर्षी झाले लग्न |
देव पूजेत तन्मय भान विसरून |
आराध्या अंगी सुंदराबाई गुण निधान|
पती सेवेत तत्पर गुण निपुण |
वयाच्या सोळाव्या वर्षाला अर्ज प्रथम नगरसी केला|
कलेक्टर अक्षर पाहून खुष बहु झाला |
दहा रुपये दरमहा कारकून जागेला |
ऐका हो संताचे पोवाडे ||धृ||
पुढे काही थोडे दिवसांनी |
कामाची हुशारी पाहून|
जबिबी कारकून पारनेर कचेरीत|
दरमहा पंधरा रुपये पगारावर्त|
पाच वर्ष काम चोख त्यांनी केले |

खजिनदार कर्जत येथे नेमले|
मिळून मिसळून वागले|
वागले लहान थोरात |
मेळ:
तीस रुपये दरमहा स्वार्थ परमार्थ करीत |
शिस्तेदार प्रांतसाहेबांचे झाले तेव्हा नगर जिल्ह्यात |
खान्देश नासिराबाद महालात |
झाले महालकारी पस्तीस रुपयावरत |
तेथेही काम चोख त्यांनी केले |
चालीसगावंचे मामलेदार झाले |
चालीसगावाहून अमळनेर बदलत |
पुढे एरन्डोल पेठेत महालकारी होत|
चाल:
एकशे पंच्याहत्तर पगार झाला |
दान धर्म अखंड खंड नाही त्याला |
झाले सत्तावनचे बंद त्या वेळेला |
फिरून फस्ट क्लास अमळनेर नेमला |
देव असती मामलेदार असा जयजयकार झाला |
झाली बदली पुढे शहादा तालुक्याला |
माता-पिता दोन्ही वारले याच जागेला |
तेथुनी बदली झाली सिंधखेड्याला |
मेळ:
सिंधखेड्याहून येती सटान्याला |
असे कळले गावोगावला |
साधू,संत,गवई,अंध,पंगु,भेटीला |
सर्वानी देवाचा जयजयकार केला |
ऐंका हि संताचे पोवाडे |
सखाराम महाराज अमळनेरला |
तसे देवमामलेदार आपणाला |
देव सटाण्यास भासती भोळा शंकर |
स्वार्थास तिलांजली परमार्थ तत्पर |
देवाची देव भक्ती गहन |
वरीष्टांशी झाले नाही सहन |
काम तुमचे हातून होत नाही बरोबर |
न घेता पेन्शन राजीनामा सत्वर |
समूळ इतिहास देवाचा कथिला |
भक्ती रस येसिना कोवाला |
यथामती कथितो तुम्हाला धरा मनी सार |

शिध्यानं भेटीस देवाला पाठविली तार |
शिंदे देव भेट मुंबईस झाली |
अपार भक्त गर्दी लोटली |
पाटली चोरली बाईंची रुदन कर |
एक पुरुष आला दर्शनाल देवा समोर |
चाल:
तुम्ही बाईंची पाटली टाका देवून |
त्यानं दिली पाटली चमत्कार पूर्ण |
चरणासी नजराणा अपार केला शिंध्यान |
नं कवडी घेता सर्व दिला वाटून |
हे तुमचे सवे देतो मी फेडून |
माझे कर्ज निवारक प्रभू असे बलवान |
मग पुढे घेतले जन्मभूमी दर्शन |
सतरा दिवस राहिले आनंदानं |
मेळ :
महाराज कर्जबाजारी झाले |
चिमणशेठ पाटोदकर येवले |
त्यांच्यापाशी काढले कर्ज वाटले याचकाला |
त्याने परत जाऊ नाही दिले अथितीला |
कान्होरे मुनसब संगमनेरवाला |
देवाचा द्वेष मनी त्याने केला |
पोटशूळ व्यथाचा झाला त्यासी आजार |
देव तीर्थ पिता त्यासी आराम झाला सत्वर |
दोन बाया दर्शना येती |
मूळच्या त्या पांगळ्या असती |
देव तीर्थ देता तीसी पूर्ववत शरीर |

गेल्या परत घरी चालून पायावर |
संगमनेरहून येती सटान्याला |
फिरून देवाचा जयजयकार झाला |
ताईबाई संत्रे असती मेंढेकर |
देवा हस्ते तिनं बांधले राम मंदिर |
विष्णूबुवा संस्थान मुल्हेरवाला |
विष्णूयोगी बोलविले देवाला |
देव भक्त मेळा जमला तिथे अपार |
भाविकजन ठेवती पायावर शिर |
चाल:
सूज अपार पार आली देव पायाला |
भाविकाने देव झाडावर बसविला |
खुंटी आली तुपाची यज्ञाची कामाला |

आडातून देवाने पुरविले तुपाला |
आवर्षण दुष्काळ पुढे पहा पडला |
वाडी वरण,भाकरी विकून चीज वस्तूला |
एक बाई आजारी पडली होती पुन्याला |
देव पाहता उठून बसली प्राण सोडला |
मेळ:
श्रीमंत तुकोजी होळकर |
त्याचा भाव बसला देवावर |
तेहतीस महिने देव राहिले इंदौरला |
एक हजार रुपये दरमहा खर्चान्याला |
सटाण्यासी एक साधू आला |
देवापासी स्त्रीदान मागू लागला |
देव देता झाला स्त्री साधू गेला घेऊन |
गावाबाहेर बोबा गेला गुप्त होऊन |
असे कळले गाव लोकाला |
वाजत गाजत परत बाईला |
ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरी राहिले जाऊन |
दान धर्म प्रभू पुण्य करू नित्य नेमान |
कठीण मागील कर्म भोग भला |
चुकेना ब्रह्मादिक देवाला |
तुम्ही आम्ही काय झाडपाला धरावे ध्यान |
देव तसेच पडले तिथे माडीवरून |
बयाच्या ब्यानव वर्षाला |
देवांचा अंत नाशकात झाला |
मार्गशीर्ष वद्य एकादशी रविवार जान |
शके अठराशे नऊ गेले ब्रह्म होऊन |
चाल:
एक महिना वैधव्य फक्त बाईला |
नासिक,सटाण्याला बांधले मंदिराला |
दोन्ही जागी होतो उत्सव वर्षाला |
सटाण्याच्या मंडळीने कार्य भाग पुरविला |
सर्वांच्या ऋणी कवी मानतो आकाराला |
जव जय यशवंतराव एक मुखाने बोला |
यशवंतराव चरणी माथा ठेवून |
लाला पाटील करती गायन |
हात जोडून महादेव न्हावी बोलला |
कवी शंकर पाटील सडक सौन्दानेवाला |
अठराशे पंधरा सन ऑगष्ट तारीख तेरा रोजीला |
त्या दिवशी महाराज जन्मले पुणे शहराला |
पेशवाईत वडील होते तेव्हा नौकरीला |
कवी :-कै.लाल(गणपती)सहादू पवार
संग्राहक:चिंधा भाऊ पवार

|| श्री यशवंतराव महाराजांचा पोवाडा - २ ||

यशवंतराव पूर्ण सांबाचे अवतार ||
कलीमधे अवतरले कीर्ति गेली मुलखावर ||धृ||
सरकारची करून चाकरी नेकी बरोबर |
अमळनेर महालाच्या बसले गादीवर |
प्रतिवादी वादी चाडती दरबारावर |
त्यासी म्हणे आपसात समजावे ते बरे |
नाही कोणावर जुलूम जबरी केला गहीजोर |
गोविंदबोवाचा समागम ठेविला निर्धार |
याचक गो ब्रहम्नावर्ती बहु ठेविला प्यार |
आला एक ब्रह्मान राहिला उभा समोर |
बायकोचे लुगडे फाटले जीर्ण झाले पार |
आत्मा ज्याचा दयाळू परमात्मा ओळखणार |
आपल्या स्त्रीचे लुगडे काढून दिधले वरचेवर |
कसे आईचे पोटी जन्मले सगुण सागर |
यशवंतराव महाराज पूर्ण सांबाचे अवतार |
कलीमधे अवतरले कीर्ति गेली मुलखावर ||१||
बाळकृष्ण डेपुटी ब्राहमण मोठा शिरजोर |
तो अमल्नेरी गेला खजिना तपासणीवर |
चाळीस हजार रुपये खजिना असून बरोबर |
दोनशे रुपये शिलंकेत कमी का आले सांगा लवकर |
मुकदमा चालविला त्याने महाराजावर |
बडतर्फीची पुकार त्याने केली मुलखावर |
गावातील सावकार सर्व बोलाविले जरूर |
पंधरा हजाराचे देणे काढले महाराजावर |
करा तुम्ही फर्याद ब्रह्मान आता मारता तो ठार |

सर्व सावकारांनी केला एकच विचार |
आमचे नाही घेणे आम्ही देती पावती भरपूर |
केला देवाचा धावा साह्य झाला ईश्वर |
दुसऱ्या दिवशी खजिना तपासता भरला बरोबर |
कसे आईचे पोटी जन्मले सगुण सागर |
यशवंतराव महाराज पूर्ण सांबाचे अवतार |
कलीमधे अवतरले कीर्ति गेली मुलखावर ||२||
यशवंतराव महाराज गेले मुंबई ठाण्यावर |
गोरा वकील येऊन मिळाला सरदार |

हायकोर्टावर चाडत चालला पहा बरोबर |
भले भले सायेब येऊन बसले सरदार |
हायकोर्टावर सभा भरली मोठ्ठी घनघोर |
भक्ताच्या धावण्या धावला तो परमेश्वर |
गवर्नरसाहेब बसले,विष्णूच्या गादीवर |
गादीवर बसता न्याय सुचला बरोबर |
तुमच्या अंगी नाही गुन्हा तुम्ही जा चाकरीवर |
तुम्हाला नेमले शहाडे महालाच्या गादीवर |
येश घेउनी आले येशवंतराव शहाद्यावर |
त्या लोकंशी झाला हर्ष शेरण्या वाटती घरोघर |
कसे आईचे पोटी जन्मले सगुण सागर |
यशवंतराव महाराज पूर्ण सांबाचे अवतार |
कलीमधे अवतरले कीर्ति गेली मुलखावर ||३||
शहादे महालाच्या गादीवर बसले सरदार |
नवसाला पावती शेरण्या वाटती घरोघर |
चार वर्ष गुर्जर पट्टीत अवतरले ईश्वर |
गुजर्पतटीमध्ये न्याय कसा चालविला बरोबर |
रयतेवरती प्रीत जशी काही लेकरावर |
आला एक ब्राह्मण उभा राहिला समोर |
घरी पोरांची मुंज रुपये पाहिजे शंभर |
धुरखेडयाचा पाटील पैशाने होता मात्तबर |
त्यासी म्हणे या ब्राह्मणाला द्यावे रुपये शंभर |
तुमचे रुपये देऊ आमचे पगारावर |
ब्राह्मणाने सवाल केला ती महाराजावर |
धुरखेडयाचा पाटील बसले होते समोर |

पाटील म्हण देईल उद्या घरी गेल्यावर |
दुसऱ्या दिवशी पाटील ब्राहमण गेले घरी बरोबर |
पाटील शिरला घरात ब्राह्मण बसला बाहेर |
नाही देण्याला थार निगुन गेला पाटील मागच्या दार |
बसून थकला ब्राह्मण मग तो लागला मार्गावर |
सत्व जाईल भक्ताचे म्हणे पंढरीचा राहणार |
पाटलाच्या निमित्ताने डाव घेतो रस्त्यावर |
उभे राहावे महाराज तुम्ही घ्यावे शंभर |

धुरखेडयाचा पाटील त्याला द्यावे लवकर |
त्याने बांधली कंबर गेला धुरखेडयावर |
घ्याओ पाटील तुमचे रुपये भरला करार |
पाटील नं घे रुपये त्यास घेऊन आला बरोबर |
हात जोडूनी उभा राहिला महराजांच्या समोर |
त्या ब्राह्मणाला मी नाही रुपये दिले शंभर |
इतका शब्द ऐकताच विप्र बोलविला लवकर |
शंभर रुपये वाटून दिले वरचेवर |
कसे आईचे पोटी जन्मले सगुण सागर |
यशवंतराव महाराज पूर्ण सांबाचे अवतार |
कलीमधे अवतरले कीर्ति गेली मुलखावर ||४||
शहादे महालाची बदली करून आले शिंदखेडयावर |
त्या लोकांशी हर्ष झाला शेरण्या वाटती घरोघर |
हलवायाच्या घरी जणू गणती साखर |
नवसाला पावती शेरण्या वाटती घरोघर |
दोन वर्षे शिंदखेड्यात अवतरले ईश्वर |
त्या गावातील पाप पळाले बारा कोस दूर |
सटाण्यासी बदली करावी झाला मजकूर |
अशी गुज लोकांना समजली ते झाले दिलगीर |
आता आपणास टाकून जातील आपले सरदार |
गावातील सर्व लोक बोळवीत आले बाहेर |
गळा पडून भेटती नेत्री सोडतात नीर |

चरणावरती लोळण मारिती ते निराधार |
काय करावे बाबा सरकारी ताबेदार |
असे लोक समजून वाट लाविले घरोघर |
यशवंतराव महाराज पूर्ण सांबाचे अवतार |
कलीमधे अवतरले कीर्ति गेली मुलखावर ||५||
सटाण्याच्या गादीवर बसले सरदार |
नवसाला पावती शेरण्या वाटती घरोघर |
नवसाचे साहित्य येते गाड्या भरभर |
इच्छा भोजन जेविती ब्रह्मान पात्र हजार |
सटाण्याहून नाशकापर्यंत जसे पंढरपूर |
लोक येती दर्शना भेटीची झाली दाटी फार |
कसे आईचे पोटी जन्मले सगुण सागर |
यशवंतराव महाराज पूर्ण सांबाचे अवतार |

कलीमधे अवतरले कीर्ति गेली मुलखावर ||६||
साहेबांचा घोडा रोगाने होता बेजार |
नवसाला पावती साहेबास कळला मजकूर |
साहेबाने नवस केला महाराजासमोर |
घोडा हुशार झालीय तीनशे रुपये ठेवीन पायावर |
महाराज बोलले घोडा मागवा समोर |
कृपादृष्टी पाहता घोडा झाला हुशार |
दान चारा खाऊ लागला तो ठानावर |
तीनशे रुपये आणून ठेविले साहेबाने महाराजासमोर |
दोनशे रुपयाचे ब्रह्मान भोजन केले लवकर |
शंभर रुपये दक्षिणा वाटून दिली वरचेवर |
कसे आईचे पोटी जन्मले सगुण सागर |
यशवंतराव महाराज पूर्ण सांबाचे अवतार |
कलीमधे अवतरले कीर्ति गेली मुलखावर ||७||
सत्व घेण्याला त्या जागेला आले ईश्वर |
अतिताच्या वेषे उभा राहिला समोर |
गादी सोडून ते आले बाहेर |
काय चाकरी सांगा महाराज करितो लवकर |
अतिताने सवाल केला महाराजावर |
तुम्ही स्त्रीदान आम्हा करावे लवकर |
इतका शब्द ऐकता घरात गेले सत्वधीर |
बायकोसी म्हणले तुमी जा अतिताबरोबर
पतिव्रता माउली पार्वतीचा अवतार |
प्रतींआज्ञा मोडूननाही केले प्रतिउत्तर |
बाई निघाली बाहेर गेली अतिताबरोबर |
सत्वधीर तुझा पती माउली तू सत्वधीर |
विजयी राहो तुझा चुडा आशीर्वाद दिला सत्वर |
कृपादृष्टी पाहता अदृश्य जाहला लवकर |
बाई आली घरी सर्वा सांगे मजकूर |
उत्तर ऐकून मनी समजले ते सगुणसागर |
सुख मानून लीन झाले त्या चरणावर |
कसे आईचे पोटी जन्मले सगुण सागर |
यशवंतराव महाराज पूर्ण सांबाचे अवतार |
कलीमधे अवतरले कीर्ति गेली मुलखावर ||८||

|| श्री यशवंतरावराव महाराजांचे कवने, भजन व भुपाळी ||

|| यशवंत कवने ||

महाराज साधू यशवंत केवळ भगवंत आहेत श्रीमंत|
पाहू जाऊ त्यासी बहु आनंद त्यांच्या दर्शनास लोकांशी| ||ध्र||
करी पूर्ण मनोरथ जसे वांचती तसे|
म्हणोनी पुसतसे|
इति परिचय म्हणोनी जन करिती नावसासी| ||१||
आंधळे कितीक पांगळे कितीक|
चांगले शुद्ध बहु बोलर धरती पायाशी |
घेती प्रसाद तिथे जोडून हस्तासी| ||२||
काय वर्णू रंगील्याचा मोठा थाट|
रस्त्याने समयांचा लखलखाट|
कापुरांचा जिकडेतिकडे घमघमाट|
असे मागे झाले नाही कुणी|
पांडुरंगानी दिला आणुनी|
पेला रुपयाचा पहा प्रत्यक्ष म्हणती सर्व साचा| ||३||
किती ती लोटांगणे पहा रस्त्याने मोठ्या हर्षाने |
करुनी स्मर्णासी देह भाव सोडून लीन होती चरणासी| ||४||
चहूकडे किर्ती फाकली नाही झाकली|
म्हणोनी मी ग्र्हधंदा जाऊनी भेटतोत्या आनंदकंदा| ||५||
प्रलाह्द कृष्णावरी करी दया भावाने चरणागंत म्हणूनिया|
करी कार्य ईश्वर माणूस असोनिया|
जे कोनी वस्तू चोरीती,अंध जे होती तया|
नाही गती मार्ग चालाया|
मन रंजीस होती साधुप्रती बोलाया|
ध्या अशात प्रसन्न करोनी मन भय धरोनी|
जन्ममरणाचे असे संत कलीमध्ये थोडे बहु साचे| ||६||
दातृत्व पहा तरी कसे द्वेत् मानीत नसे दया बुद्धी वसे |
भक्ती धर्मासी अतीत ब्राहमण घेती भोजनासी |
करिती नेमाने त्रिकाल स्नान |
करिती श्रवण भागवत व्यास पुराण|
अज्ञानी सज्ञानी समसमान|
काया वाचा मनी पूर्ण|
हेतूने भजा तुमी त्यांना भव रोगापासुनी दूर का व्हाना| ||७||
किती यात्रा वाहते तरी संगमनेरी प्रवरा तीरी|
गर्दी स्नानाची जशी पर्वणी कपिला षष्टीची|
भय कुणाचे नाही तिळभरी कि निर्भय परी|
होतो घरोघरी गजर नामाचा|
मोठेमोठे लोक ठेविती बंदोबस्त यात्रेचा|
किती नारळ फुटती याचे नाही गणित|
किती साखर पेढे वाटती अगणित|

टाळ मृदंग वाजे खणखणीत|
सामर्थ्य वर्णू तरी किती|
कनक धन संपत्ती तुच्छ मानिती|
लोभ नाही त्यांना बाळ सुनील नमे यांना| ||८||
महाराज साधू यशवंत केवळ भगवंत आहेत श्रीमंत|
पाहू जाऊ त्यासी बहु आनंद दर्शनास लोकांशी |
कृष्णाजी देशपांडे (भोसे, ता. पंढरपूर )

|| भजन ||

शके १८०९ सर्वाजीन्नाम संवत्सरा मधी
केले प्रयाण विठ्ठल शब्दी |
मासामाजी हो श्रेष्ठ मार्गशीर्ष |
कृष्ण हरी दिनी जान उपासी |
रविवारी रवी उदयासी |
विमान आले सत्पुरुषासी |
पद स्मरणाला अविनाशी |
तो हा यशवंत, यशवंत अंती झाला || हरी ज्योतिषी मिळाला ||धृ||
जन स्थानीचे उभे रडले |नेत्रांबू सर्व आटले |
सद्भाक्तांचे कंठ सदगदित झाले | आनंदी भजनी रमले |
हरिनामाचे वाद्याघोष निघाले | रायाचे विमान उठले |
नरहरी पाहू आले अद्वैत मानसी झाले |
संचित क्रियमाणे भूलोकी धन्यची झाला | हरीज्योतीसी मिळाला |
दर्शन इच्छेने असंख्य जान लोटला | जातीभेद नं उरला |
भक्तीभावाने भुलला संसाराला | धावूनी धरी चरणाला |
मुद्र्कास नाही गणती |पुढे विमाने झोकती |
संचित क्रियमाणे भिलोकी धन्यची झाला |हरीज्योतीसी मिळाला |
किती चंदन हो मैलागिरी | सोडून आला |
साधुसंगे पवित्र झाला |
कपूर गुगुळाच्या उठती भयानक ज्वाला |
चुंबितसे स्वच्छ गगनाला |
चित्ररेखा हो देखावा घेती |
सायंकाळी दिवे लाविती |
शोभेची दारू सुटती | हरदास किर्तना करती ||३||
शेवटचा दर्शन लाभ झाला | हरीज्योतीसी मिळला|
यशवंत अंत झाला | हरीज्योतीसी मिळला|

|| भजन ||

सुदिन उगविला | मला संत दर्शनाचा लाभ झाला ||धृ||
चला रे चला नासिकला | पाहू समाधीला |
यात्रा मोठी घनदाट |

रस्त्यावरी नाही वाट |
पोलीस येती बंदोबस्ताला || मला संत दर्शनाचा लाभ झाल ||१||
एकदशी पुण्यतिथी |
आनंदे जागर करिती |
बहुजन येती भजनाला | मला संत दर्शनाचा लाभ झाला ||२||
द्वादशीसी पालखी मिरविती |
दिंड्या पताका सह नाचविती |
लोक येती भजनाला | मला संत दर्शनाचा लाभ झाला ||३||
श्री यशवंत महाराज भोसे गावचे |
प्रतिक गोमटे मानवतेचे |
किर्तीवेल त्रिभुवनी बहरला | मला संत दर्शनाचा लाभ झाला ||४||
सुनील दीपक जोडी हाता |
चरणावर ठेविती माथा
संत देती आशीर्वादाला |
मला संत दर्शनाचा लाभ झाला| ||५||

|| भूपाळी ||

देह तालुका यशवंताने मामलती केली |
स्वर्गीचे सूर ऐकून कीर्ति पिटती हो टाळी | ||धृ||
अनुतापाची कठीण परिक्षा उत्तरे त्या काळी |
सद्गुरुने हि काग मोठी यशवंता दिधली |
हाताखाली विवेक फडणीस बुद्धी ज्यांची चांगली |
पुण्य तिजोरी कडेच शम दम जोडी बरी शोभली |
निश्चय पहारेकरी | उभा हो |
भक्ती खडग धरी करी | सदा हो |
अलबेलची हरी हरी पुकारी |
ब्रह्मानुभवची फौजदार हा चीरती धुरीन्दाली |
जबाब निशीला धर्म उभा हा कापे ज्याला कली |
देह्तालुका यशवंताने मामलती केली |
कामक्रोधादिकि तालुका त्रासविला होता |
खोड तयाची बरी मोडली नुचालती शीर आता |
रांड पल्पुती बरी माया आली शेवटी ती हाता |
रायत सर्व हो सुखी | पहा हो |
भावंडा सारखी | वागती |
सद्गुण पिकले पुण्यपेठ हि | भारीच सरसावली |
सूर कुळ | टिळक श्री नारायण भक्ती जनी ठसली |
देह तालुका यशवंताने मामलती केली ||२||
संपादक:अशोक देवदत्त टिळक
नं.वा.टिळक इ.स.१८८७
व्हीनस प्रकाशक पुणे

|| साधुवर्य साहेब श्री यशवंतराव महादेव भोसेकर मामलेदार यांची कवितारुप प्रस्तावना प्रारंभ ||

यशवंतराव महादेव का नाम |
करते मामलेदार का काम |
जसे उतर पडे भगवान |
आनके खडे रहे है| ||१||
महाराज दिखते जागती जोत|
पुण्या होता है बहुत ऐसा दूर दूर|
आवाज जाता है| ||२||
पुण्य करते अन्नदान|
बडे बडे थके पुराण|
गया काशी खंड के नाम|
ऐसा कीर्तिका बोभाट है| ||३||
कईक भगत* ठुमैत ढोंगी|
कि बात करते बढेगी|
हातमे बजाते पुंगी|
वो तो साग लेके फिरते है| ||४||
नाम सुनना तुमारा|
मुलूख धुंडते आया सारा|
आराय सटाणे पवन पुत् वारा|
व्हा ठाणा दिया है| ||५||
हमको दिखत ब्रहाम्देव|
खाते मालपवा जेव|

मुंसे लगाते खरीसेव|
ऐसा साधुकू भोजन हित है| ||६||
देखो कलिका मान|
कैसा चलता ब्रह्मज्ञानं|
बडे बडे राजर करते ध्यास|
ये तो आश्चर्य कि बात है| ||७||
कोई जल्मे देवदत्त|
लेते कुणबी का मत|
ऐसा खूप चलता है मत|
चौ मुलूखमे डंका गया है| ||८||
मृत्यु लोकमे दैवत जलमे यार|
पुण्य करता नही पार|
सब काशी खंडका सार|
ह्या लोक मिलाया है|
कई माउलीके पूत|
पेठ जलमे सपूत|
कीर्ति कैरे मजबूत|
एतो भगवत का रूप कबी नही छुपता है| ||९||
लोक करते मान|
ऐसा पंडित कू मान|
चवखुटे मि नशान|

लगा दिया है|
देखो महाराज का थाट|
कीर्ति करते अचाट| ||१०||
आगाडे आते भाट|
रुपये देती निकाल साठ|
लेते घरो कि वाट|
वो तो खुषी हो जाते है| ||११||
घरमे बिचारी लछुमी गऊ|
उनकी क्या वर्तणूक कहू|
पडा साधू संत पार जीव|
जयजयकार होता है | ||१२||
सभा बैठी घनदाट |
सबी उडता रंगथाट |
भरे दहीदुध का माठ|
रेलचेल हिती है|
बाई डालती तूप कि धार| ||१३||
ब्राहमण करते हर हर|
साधू करते विचार |
ऐ तो पुण्य का अधिकार|
लेना लगाया है|
देखो ऐसा चलता हैसत| ||१४||

जैसा शंकर कामत|
साधू करते बिचार |
ए तो पुण्य का अधिकार| ||१५||
लेना लगाया है|
देखो ऐसा चलता हैसत|
जैसा शंकर कामत|
सीबी राजा के मत|
ए सत्वधीर निवाडे है| ||१६||
वस्ताद गरीब बोलते नुगते|
जैसे तीनो ताल झुकते |
एबी कबी मुगते|
क्या कहू कबित कि बढई| ||१७||
जैसे झान्झरी मढाई|
कडी से कडी जडाई|
बडे लटक से कहता है| ||१८||
आया सरसोती का फेर|
बनाई सबदोन का ढेर|
जैसी साटोन कि मेर|
ऐंसी मिठास लगती है| ||१९||

|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2020 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation