|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| नौकरी ||

महाराज मामाच्या गावी असतांना नित्यनियमाने पहाटे गोदामातेच्या तीरी स्नान करीत. तेव्हा महाराजांच्या मनात आले की, गोदामाता कशी काय तिच्या विशाल हृदयात सर्वांना स्नान देते. कोटयावधी तहानलेल्यांची तहान भागवते. गरीब श्रीमंत भेद न बाळगता कशी काय तिच्या तीरावर सर्वांना आश्रय देते. तेव्हा महाराजांनी प्रार्थना केली.- " हे परम पवित्र गोदामाते, मलाही तहानलेल्यांची तहान भागवित, भुकेल्या जीवांना अन्न देत, निराश्रितांना अभय देत, जो जे वांच्छील ते त्याला देत अनंतकोटी ब्रम्हांडनायकाच्या स्वरुपात लीन होण्याची व कर्तव्य मार्गावर दिप होण्याची शक्ती दे. इ.स. १८२९ मध्ये यशवंताला मामांच्या खटपटीने बदली कारकून म्हणून येवले येथे तात्पुरती नोकरी मिळाली. यशवंत येवल्यास आला. कोपरगावी मामा व गोदामाई यांची साथ होती. गोदामाईच्या उत्तरेस ९-१० मैलांवर असलेले येवले गाव! इथे ना नदी ना ओळख पाण्याचे दुर्भिक्षच! अशाच वैशाख वणव्यात जीवन कंठावयाचे आहे. ह्या प्रखर सत्याची जाणीव त्याला झाली. परंतु गोदामाईचे उदाहरण त्याच्यासमोर होते. मुखी भगवंत नामस्मरण होते व जवळ कर्तव्यबुद्धी होती. तसेच सदाचाराचे तेजस्वी वलय मार्गदर्शनार्थ होते. फिरतीचे काम असूनही तो ते चोखपणे करीत असे. या चोखपणामुळे तो रावसाहेबांच्या मर्जीस व सदाचरणामुळे शेजाऱ्यांच्या आदरास पात्र ठरला. हा हा म्हणता दोन वर्षे निघून गेली. ई.स. १८३१ मध्ये नगरच्या कलेक्टरसाहेबांचा सरकारी मुक्काम येवल्यास पडला. सर्व कनिष्ट अधिकारी तेथे जमले होते. नारायणरावांनी यशवंताला बरोबर घेऊन कलेक्टरसाहेबांची भेट घेतली व नोकरीचा अर्ज दिला.गोऱ्या साहेबांनी यशवंताचे मोत्यासारखे अक्षर, व बदली कारकून म्हणून केलेले चोख काम पाहून त्याच मुक्कामात नेमणुकीचा हुकूम दिला आणि महादेव कुलकर्णींचा यशवंत दरमहा रु. १०/- पगारावर कारकून म्हणून सरकारी नोकरीत यशवंत महादेव भोसेकर म्हणून येवले येथे काम करू लागला. नोकरीची मुलायम वस्त्रे अंगावर आली तरी यशवंतरावांच्या कामात ढिलाई आली नाही की ते परमार्थापासून दूर गेले नाही.

"जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले ||
तोची साधु ओळखावा | देव तेथेची जाणावा ||"

महसुल खात्यातील महान संत

संतश्रेष्ठ देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज हे आधुनिक काळातील एक महान देवपुरुष होत. काही काही गावांची नशीब थोर असतात. ज्ञानोबारायांमुळे आळंदीला महत्त्व प्राप्त झाले. तुकोरायांमुळे देहुला महत्त्व प्राप्त झाले, तसेच सटाण्याला महत्त्व प्राप्त झाले ते देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांमुळेच. देवमामलेदार सटाण्याला आले आणि इथल्या लोकांचे भाग्य उजळले. महाराजांनी १८२९ ते १८७२ या काळात रेव्हेन्यु खात्यात ४३ वर्ष सेवा केली. प्रथम येवला, चाळीसगाव, एरंडोल, अंमळनेर, शहादा, धुळे, सिंदखेडा व शेवटी सटाणा येथे सेवा केली. सटाण्याला असतांनाच ते सेवानिवृत्त झाले व इथेच संतपदाला पोहोचले.

गोर-गरीब, दीन-दुबळे, अनाथ, पीडीत यांच्यातच महाराजांना देव दिसला. म्हणुन मामलेदार असुनही कोणीही याचक त्यांच्या दारातून रित्या हाताने परत गेला नाही. आपल्याला जे मिळते ते नारायणाच्या कृपेने यावर त्यांची श्रध्दा होती. म्हणुनच "परोपकारी रावसाहेब" अशी त्यांची रेव्हेन्यु खात्यात ओळख होती. दामाजी पंतांनी भुकेल्यांसाठी धान्याचे गुदाम रिते केले त्याची भरपाई स्वतः पंढरीनाथांनी केली. १८७०-७१ च्या बागलाणतील भयंकर दुष्काळात देवमामलेदारांनी गोरगरिब, दुष्काळ पीडीतांसाठी सरकारी खजिन्यातील एक लाख सत्तावीस हजार रुपये वाटुन दिले. स्वामी समर्थांच्या कृपेने खजिना पुर्ववत भरला. हा दैवी चमत्कार होता. महाराज देव पदाला पोहोचले. खुद्द तपास अधिकारी जो इंग्रज होता तो देखील या चमत्काराने चक्रावुन गेला.अध्यात्म साधना म्हणजे लौकीक व्यवहाराला पाठ दाखविणे नव्हे उलट आपल्या नैमित्तिक कर्मात, दिनचर्येत अध्यात्म मुरवुन घेणे हे होये, ही महाराजांची जीवनश्रध्दा होती.रेव्हेन्यु सारख्या स्वार्थाने व भ्रष्टाचाराने बरबटलेल्या खात्यात काम करतांना महाराजांनी हा कलंक आपल्याला कधी लागु दिला नाही. परमार्थ हेच त्यांचे जीवनमुल्य होतेय म्हणुनच "श्री संत" "देवमामलेदार" या बिरुदावलीने ते सर्वदुर परिचित झाले. देवमामलेदार यशवंतराव महाराजांचे चरित्र रज, तम गुणांवर मात करुन सत्त्वाकडे झेपावणारे यासाठी प्रेरणादायी आहे.

|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2019 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation