|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| जन्म व बालपण ||

महादेवपंतांचे द्वितीय अपत्य यशवंत हेच आपले चरित्रनायक होत. प्रस्तुत प्रकरणी संत कवी श्री.दासगणूंनी “अर्वाचीन श्री भक्त लीलामृत” ह्या ओवीबध्द ग्रंथात अध्याय क्रमांक २२ मध्ये मनोवेधक पार्श्वभूमी कथन केली आहे. भगवद्‌भक्त दामाजीपंत (मंगळवेढे) हरीपदी (वैकुंठी) पावल्यानंतर काही कालाने श्री हरीने त्यांना म्हंटले “भूतलावर लोक पापकर्मात पैसा घालवीत आहेत. म्हणून लोकांना भूतदया शिकविण्यासाठी तू अवतार घ्यावास.” दामाजींनी म्हंटले. “देवा तुम्ही म्हणता ते ठीक आहे. पण ह्या मोक्षदायी भूतदयेचा भूतलावर प्रसार करण्यासाठी द्रव्य खूप लागेल. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी अवतार घेतला व तू मला खूप धनवान केलेस तर मी खूप धर्म करीन पण त्यामुळे लोकात भूतदया कशी वाढणार? लोक म्हणतील –“ आहे धनवान म्हणून काही धन धर्मार्थ खर्च करतो. – पण यामुळे पतितांचा उद्धार कसा होणार?” देव म्हणाले – “अरे मी तुला एक युक्ती सांगतो. मी काही तुला धनवान करणार नाही. तू लोकांकडून उसने द्रव्य घ्यावयाचे व ते सर्व धर्मकार्यात खर्च करावयाचे. म्हणजे दोन्ही गोष्टी साध्य होतील. एक म्हणजे पापकर्माकडे जाणारे धन तुझ्याकडे येईल व तुझ्याकडून त्याचा विनियोग गोरगरीबांसाठी होईल. द्रव्य देण्यारयाला पुण्यलाभ होईल. व गोरगरिबांची दु:खे नाहीशी होतील. यात तुला यत्किंचितही दोष येणार नाही. ज्याप्रमाणे गवळी स्वतःच्या हाताने भांडयात दूध साठवतो. त्याचे फळ गवळ्यालाच मिळते. पात्र मात्र त्यात दूध असूनही अलिप्त राहते. तद्वतच तुला परद्रव्य स्वीकारल्याने दोष लागणार नाही.” ठीक आहे. मी कुठे अवतार घेऊ?” पंतांनी विचारले. देव म्हणाले – “आपल्या पंढरी जवळच भोसे नावाचे गाव आहे. तिथे धोंडोपंत नावाचा लेखनपटू वतनदार माझा भक्त आहे. तो माझी नरहरी स्वरुपात भक्ती करतो. त्याचा सदाचारसंपन्न पुत्र महादेव नावाचा आहे. या महादेवपंतांच्या कुशीत तू जन्म घ्यावास.” चारीत्रानायकाच्या अवताराची संत कवी श्री दासगणू महाराजांनी वरीलप्रमाणे पार्श्वभूमी सांगून असे म्हंटले आहे की –

ऐसा पूर्वीचा इतिहास | स्वप्नी सांगे जगविन्नास ||
तेच कधी मी श्रोतयास | नाही माझ्या कल्पनेचे ||२३||

महादेवपंतांना पहिला मुलगा झाला. त्याचे नाव दादा ठेवले.हरीदेवीला दुसरयांदा दिवस गेले. यावेळी तिचे डोहाळे पुरविण्यात महादेवपंतांना विशेष आनंद होत असे. कारण डोहाळेच तसे होते! “अन्न संतर्पण, इच्छादान, हरी नामस्मरण, नामसंकीर्तन हे सतत आपल्या घरी व्हावे.” असे हरीदेवी म्हणे व पंत मोठ्या आवडीने ते सर्व करीत असत. आठव्या महिन्यात हरीदेविला माहेरचे बोलावणे आले. ती पुण्यास आली. शनिवार पेठेतील ओंकार वाड्यात वाजपे राहत असत. येथेच शालिवाहन शके १७३७ भाद्रपद शुद्ध दशमी बुधवारी सुर्योदयीसमयी हरीदेवीला द्वितीय पुत्ररत्न झाले. सर्वत्र आनंदीआनंद झाला. दोन वर्षातच यशवंता सज्ञानाप्रमाणे वागू लागला. महादेवपंतांना या तेजस्वी पुत्राकडे पाहून धन्यता वाटत असे. तिसरया वर्षी यशवंताचे जावळ काढले. यशवंतच्या बाळलीला ह्या देव पूजेशी निगडीत होत्या. आणखी दोन वर्षांनी यशवंताचे शिक्षण सुरु झाले. घरातील वडीलधाऱ्या माणसांचे वागणे बोलणे व कृती यांचे निरीक्षण व अनुकरण लहान मुले करतात हा सार्वत्रिक अनुभव आहे. घरातील पवित्र वातावरणाने बाळ यशवंतावर चांगलाच परिणाम झाला.महादेवपंतच पहाटे उठून भगवन नामस्मरण करीत. ते ऐकून यशवंताला जाग येई व तो वडिलांजवळ जाऊन बसे. पंत प्रेमाने त्याला मांडीवर घेत व नामस्मरण करायला शिकवित आणि मग उजाडेपर्यंत पितापुत्रांच्या मंद पण सुरेल आवाजाने वाडा डोलत असे. सकाळी तो शुचिर्भूत होऊन देवघरात जाई व मन:पूर्वक दर्शन घेई. नंतर वडील व आई यांना नमस्कार करून अभ्यासाला जाई. इतर मुलांबरोबर खेळतांना कधी कधी आडदांड मुले यशवंताशी भांडत व क्वचित त्यास मारदेखील खावा लागे. पण ही भांडणे एकतर्फीच असायची. कारण यशवंता शांत बसे त्रास झाला तरी निमूटपणे तो सहन करी. मग यशवंता आपली भावंडे व इतर सवंगडी यांना घेऊन देवपूजेचे खेल खेळू लागे. यशवंता हळूच देवघरात जाऊन शालीग्राम किंवा दत्तमूर्ती उचलून आणी. तिची खेळत स्थापना करुन पूजा करी. नंतर सर्वाना हात जोडून प्रार्थना करी. असा खेल रंगात आला असतांना मध्येच वडील बाहेरून घरी आले तर मुलांची मोठी त्रेधातिरपीट उडे व पळून जात. पण यशवंता मात्र कधीही पूजा सोडून पळून गेला नाही.

|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2020 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation